देशात थंडीचा कडाका आणखी वाढणार .बाळकडू वृत्तसेवा

नवी दिल्ली : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र, भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. पण आता थंडीच्या कडाक्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २० आणि २१ जानेवारी रोजी पर्वतीय भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर उत्तर भारतात काही भागात दाट धुक्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.आली आहे. ___ हवामान विभागानुसार, पुढील २४ तासांत पंजाब, हरियाणा, चंडीगढ, दिल्ली, मध्यप्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, राजस्थान आणि ओडिशामधील काही भागात दाट धुकं असू शकतं. धुक्यामुळे तापमानाचा पारा आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. कच्छ, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुढील २४ तासांत शीतलहरीचा परिणाम दिसू शकतो. शीतलहरींमुळे थंडीच्या कडाक्यात अधिक वाढ होऊ शकते. दिल्लीत दाट धुक्यासह कमाल तापमान १६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ९ अंश सेल्सिअसच्या जवळपास राहणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. झारखंडमध्ये सोसाट्याच्या वार्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तरप्रदेश तसंच दिल्लीतील काही भागात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.